मनमाड (सौ. नैवेद्या बिदरी) :- दारु पिऊन त्रास देणाऱ्या आणि सातत्याने आपल्याला मारहाण करणाऱ्याला पतीला पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या सहाय्याने जीवे मारल्याची घटना तालुक्यातील न्यायडोंगरी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील न्यायडोंगरी गावातील वृंदावन नगर, त्रिमूर्ती पेट्रोल पंपा समोर राहणारे मीराबाई ममराज राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी उषा संजय गायकवाड आणि तिचा अल्पवयीन मुलगा (दोघे रा. न्यायडोंगरी) यांनी संगनमत करून संजय गणेश गायकवाड यास जीवे ठार मारले.
मयत संजय हा रात्रीच्यावेळी दारू पिऊन येऊन पत्नी व मुलाला मारहाण करीत असत. हा राग मनात धरून आरोपी पत्नी उषाने पती संजय याचे डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिने व मुलाच्या मदतीने नायलॉन दोरी च्या सहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला.
याप्रकरणी नांदगाव पोलिसात भारतीय दंड संहिता 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी मनमाड सोहेल शेख , पोलीस निरीक्षक नांदगाव प्रीतम चौधरी यांच्या मारगदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज वाघमारे हे करीत आहेत.
दरम्यान, मयत संजय गायकवाड याच्या न्यायडोंगरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत संजय गायकवाड च्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. नांदगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवीत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यात मुलगा हा अल्पवयीन असल्याने त्यास बालसुधारगृहात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.