मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र राहिल्याने गेल्या ४० वर्षापासून पूर्णाकृती बसविण्यात यावा ही मागणी होती. आज या मागणीला यश आले. आमदार सुहास कांदे यांनी विशेष प्रयत्न करत पूर्णाकृती पुतळ्याचे मनमाडकरांचे स्वप्न पूर्ण केले. शहरातील रेल्वे स्टेशन गेटसमोर संविधानाचे शिल्पकार युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक उभारण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी शहरातील मेन रोड अर्थात एकात्मता चौकासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली. या लोकार्पण कार्यक्रमाला सज्ज असलेल्या शहरात अभिवादनाचे डिजिटल फलक, निळ्यापताका, निळेध्वज लावून सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती असल्याने या मंगलदिनी दु. १२ वाजता जगविख्यात पुज्य भदन्तं डॉ. राहुल बोधी महास्थविर यांच्या हस्ते आमदार सुहास कांदे, सौ. अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेल्या भिख्खू संघाला आमदार कांदे पती पत्नी यांनी चिवरदान करत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांनी ' डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ' च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. रात्री उशिरापर्यंत कुटुंबासह अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र अहिरे, गंगादादा त्रिभुवन यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळा उभरल्याबद्दल आमदार सुहास कांदे, सौ. अंजुम कांदे, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी फरहान खान यांचा आंबेडकरी अनुयायांच्यावतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
शहरात पूर्णाकृती पुतळे उभारले जावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आंदोलने, मोर्चे, निवेदने दिली होती. पालिकेत कौन्सिलने अनेकदा ठराव करून शासन दरबारी प्रयत्न केले. मात्र याच दरम्यान माजी नगरसेवक रवींद्र घोडेस्वार यांनी प्रतिज्ञा केली की जोपर्यंत शहरात पूर्णाकृती पुतळे उभारले जात नाही तोपर्यंत मी माझी दाढी काढणार नाही आणि पायात चप्पल घालणार नाही. शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभे राहत असल्याने आज आमदार सुहास कांदे यांनी रविंद्र घोडेस्वार यांनी केलेल्या प्रतिज्ञेची दाढी काढत आणि चप्पल घालून सांगता केली.
त्यामुळे पुतळा आंदोलनात ज्यांनी सहभाग दिला त्या सर्व आंदोलकांचा आमदार कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे स्वरसम्राट मिलिंद शिंदे यांच्या भिमगीतांचा कार्यक्रम सायंकाळी पुतळ्याजवळ संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने मनमाडकर उपस्थित होते
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी ....
आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभा राहिला असून त्याचे लोकार्पण करतांना बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात यावी ही आमदार सुहास कांदे यांनी मांडलेली संकल्पना त्यांनी आज प्रत्यक्षात उतरविली. सामाजिक कार्यकर्ते अमोल खरे, माजी नगरसेवक संतोष अहिरे, संजय निकम, दिलीप नरवडे, कैलास अहिरे, पद्माकर निळे , विजय उबाळे आदींना हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत अभिवादन करण्याचा मान देण्यात आला. यानिमित्ताने सर्वांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले.