मनमाड (सौ. नैवेद्या बिदरी) :- शहरातील सरदार पटेल रोडवरील तीन मजली कपड्यांच्या दुकानाला रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली.
या आगीत दोन मजले जळून खाक झाले आहेत. सध्या दिवाळीचा सण सुरू असल्याने फटाक्यांमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सरदार पटेल रोडवरील मदनलाल ओंकारमल पारिक या कापड दुकानाच्या वरच्या मजल्याला रात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या दुकानामध्ये कपडे व लाकडी इमारत असल्याने बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. मनमाड अग्निशमन दल, व्यापारी व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र वरील दोन मजले जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दिवाळीच्या फटक्यांमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.