शुक्रवार ठरला वाहतूक कोंडीचा दिवस...रेल्वे ओव्हर ब्रीजवर दोन मालवाहू ट्रक मध्ये झाला बिघाड ; ९ तास वाहतूक विस्कळीत : पर्यायी मार्ग करण्याची मागणी...
शुक्रवार ठरला वाहतूक कोंडीचा दिवस...रेल्वे ओव्हर ब्रीजवर दोन मालवाहू ट्रक मध्ये झाला बिघाड ; ९ तास वाहतूक विस्कळीत : पर्यायी मार्ग करण्याची मागणी...
img
Dipali Ghadwaje
मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजवर वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी पहाटे आणि दुपारी  मालवाहतूक ट्रक मध्ये बिघाड झाल्याने सुमारे ९ तास वाहतूक विस्कळीत झाले.रस्त्याच्या मधोमध ट्रक मध्ये बिघाड झाल्याने सकाळपासून वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.रेल्वे ओलांडणारा हा एकमेव पूल असल्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पर्यायी मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

इंदूर ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग मनमाड शहरातून गेला आहे. तर याच मार्गाला मुंबई नाशिक,चांदवड तसेच धुळे,मालेगाव, आणि संभाजीनगर, चाळीसगाव, जळगाव नांदगाव मार्ग मालेगाव चौफुली येथे येऊन मिळतो. या महामार्गावर शहराच्या मधोमध रेल्वे मार्ग गेल्यामुळे रेल्वे ओलांडण्यासाठी रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने दळणवळणच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे.

शुक्रवारी पहाटे पहाटे चार वाजेच्या सुमारास सुमारास मनमाड-येवला मार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजवरून मालेगावहून येवला कडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक ( क्रं. जीजे.०३ बीव्ही ७५९६ ) चढत असताना ट्रक बिघडल्यामुळे तो रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. तर दुपारच्या सुमारास रेल्वेचा ओव्हर ब्रिज चढून येवला कडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक ( एमएच ०४ सीजी ६६०१ ) रेल्वे ओव्हर ब्रिजच्या मध्यभागी ट्रक बिघडल्यामुळे तो रस्त्याच्या मधोमध उभा राहिल्याने वाहतूक कोंडी झाली.शुक्रवारी सकाळी आणि दुपारी रेल्वे ओव्हर ब्रिजवर दोन मालवाहू ट्रक बिघडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. गाड्या जाण्या येण्यास जागाच नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीचा फटका मनमाड - चांदवड, मनमाड - मालेगाव, मनमाड - नांदगाव मार्गाला बसला या मार्गावरही लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. 

शुक्रवारी पहाटे आणि दुपारी हा प्रकार घडल्यामुळे शाळा, कॉलेज, शिक्षणासाठी बाहेरगावी जाणारे चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशी यांचे मोठे हाल झाले. अनेकांना आजच्या दिवसाची सक्तीची रजा घ्यावी लागली. तर शाळा कॉलेजला दांडी मारावी लागली. अनेक प्रवाशांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. दरम्यान या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेसह रुग्णांना देखील बसला.या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. एकाच दिवशी दोन वाहने बिघडल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना सर्वांनाच करावा लागला. बंद पडलेल्या गाड्या रस्त्यातून हटवल्यानंतर हळूहळू वाहने पुढे सरकू लागली. वाहने निघू लागल्याने वाहतूक कोंडी कमी होऊ लागली. रात्री उशिरापर्यंत या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.
 
१ ) वाहतूक कोंडी का होते...

मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गचा मालेगाव येथून फाटा फुल्याने होऊन मनमाडमार्गे सोपा रस्ता आहे. यामुळे  वाहनचालकांची पहिली पसंती असलेला इंदूर - पुणे राष्ट्रीय महामार्गाला आहे. दरम्यान धुळे - छत्रपती संभाजी नगरला जोडणारा कन्नड घाट वाहतुकीसाठी बंद असून मालेगाव - नांदगाव मार्गे छत्रपती संभाजी नगरला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.मनमाड मार्गे पुणे,सोलापूर, बेळगावला जाण्यासाठी सोयीस्कर आणि बिनाघाटाचा महामार्ग असून मोजकेच टोल असल्याने वाहनचालक या राष्ट्रीय महामार्गाचा जास्तीत जास्त वापर करतात.तसेच या महामार्गावर ठिकठिकाणी मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसतात त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते.

२ ) चौपदरीकरण, रिंगरोड अथवा उड्डाणपूल याची गेल्या अनेक वर्षापासून मागणी...

शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि मनमाडकरांकडून अनेक आंदोलने आणि शासनाला निवेदन देखील देण्यात आले. मात्र यावर अद्यापही कोणताही तोडगा निघाला नसून मनमाड शहराला पाचवीला पुजलेला पाणी प्रश्न शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात मार्गी लावून मनमाडकर यांचे स्वप्न पूर्ण केले. त्याच धर्तीवर आता मनमाडकरांना वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी चौपदरीकरण, रिंगरोड अथवा उड्डाणपूल व्हावे,अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

३ ) चौपदरीकरण, रिंगरोड अथवा उड्डाणपूल का व्हावे...

मनमाड इंदूर - पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, रिंगरोड अथवा शहरात उड्डाणपूल झाल्यास अवजड वाहने हे शहराच्या बाहेरून अथवा उड्डाणपुलावून जातील.यामुळे शहरामध्ये होणारी वाहतूक कमी होईल आणि अवजड वाहनांना सोईस्कर मार्ग उपलब्ध होईल. अपघातांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील मार्गी लागेल.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group