मनमाड (नैवेद्या बिदरी) :-
शहरातून जाणाऱ्या इंदोर - पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील सानप कॉम्प्लेक्स समोर भर रस्त्यात दुभाजकावर असलेला विजेचा मोठा खांब भर रस्त्यात कलंडल्यामुळे आज दुपारी या राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होऊन वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. सायंकाळी उशिरा हा वाकलेला पूल सरळ करून तो उतरवून घेण्यात आला. त्यानंतर वाहतूक संथ गतीने सुरू होवून सुरळीत झाली.
याबाबतची माहिती अशी की, मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून इंदोर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. मालेगाव - मनमाड - शिर्डी या मार्गावर असलेल्या पाकीजा कॉर्नर अर्थात सानप कॉम्प्लेक्स समोर शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्त्याच्या दुभाजकावर असलेला मोठा इलेक्ट्रिकचा खांब भर रस्त्यात कलंडला.
त्यामुळे मनमाड होऊन येवल्याकडे जाणाऱ्या वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली तसेच त्याचा परिणाम मालगावकडे जाणाऱ्या वाहन देखील खोळंबली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. भर उन्हात वाहने ताटकळत उभी राहिल्याने नागरिकांची प्रचंड गैरसाई झाली.
सध्या विकेंड मुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊ लागल्याने अखेर पोलीस ही रस्त्यावर उतरले.
रेल्वे उड्डाण पुलाच्या सुरुवातीला तसेच पाकीजा कॉर्नरवर पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. नगरपरीषद कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.भर रस्त्यात वाकलेला इलेक्ट्रिकचा खांब काढून घेण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील मोठ्या प्रमाणावर खोळंबलेली आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेली वाहतूक रात्री उशिरापर्यंत हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली होती.