नांदगाव तालुक्यात इसमाचा खून;
नांदगाव तालुक्यात इसमाचा खून; "हे" कारण आले समोर
img
दैनिक भ्रमर

मनमाड (प्रतिनिधी) :- नांदगाव  तालुक्यातील साकोरा येथे वेहळगांव रस्त्याच्या बाजूला दिपक रमेश कदम याची पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे (रा. साकोरा) यांच्याविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात भा. दं. वि कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील साकोरा- वेहळगाव रोडवर मुळ डोंगरी फाट्यावर  रस्त्याच्या कडेला एक पुरुषाचा मृतदेह असल्याचे ॶॅंब्यूलन्स चालक शांतीनाथ राठोडला दिसल्याने साकोरा येथील काही मित्र तसेच पोलिस पाटील बाबासाहेब बोरसे यांना माहिती दिली. यावर नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचत मृतदेहाची ओळख पटवली.

ही मयत व्यक्ती दिपक रमेश कदम (वय ३०, रा. साकोरा) असे समजले. त्यास पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे यांनी दगडाने व लोखंडी रॉडने डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला. सदर मयताचा अपघात झाला आहे असा बनाव करून वेहळगांव रस्त्याच्या कडेला आणून टाकले होते.

याबाबत मयत दिपक, त्याचा भाऊ भाऊसाहेब, संशयीत आरोपी योगेश व देवाजी यांचेत आर्थिक व्यवहार झाले असल्याचे समजते. तसेच मयत दिपक एक वर्षापासून गावातील एका विवाहित महिलेबरोबर संबंध ठेवून संसार करीत होता. त्यामुळे सुरूवातीला अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय बळावला होता. मात्र पोलिसांनी लावलेल्या छड्यात आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचे निष्पन्न झाले.                                                 

सदर घटनेत वरील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, अटक करण्यात आले आहे. मयताची पत्नी मनीषा दिपक कदम रा. साकोरा हिचे फिर्यादीवरून  नांदगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group