१२ मे २०२६
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात कमालीचे बदल होताना दिसत आहेत. राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसानंतर वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता, मात्र आता तापमान झपाट्याने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भात पुढील काही दिवसांत तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोल्यात तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातही उष्णतेची तीव्रता वाढली असून पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव भागात तापमान 44 अंशांवर गेले आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशांच्या पुढे गेला आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनासह बाजारपेठांवरही होत असल्याचे चित्र दिसत आहे.
तर नाशिक शहरात दोन वर्षांनंतर प्रथमच तापमान 42 अंशांच्या जवळ पोहोचले आहे. हवामान विभागाने नाशिकसाठीही उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस तापमान उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्ह्यातही उष्णतेचा प्रकोप वाढत असून तापमान 45 अंशांच्या आसपास पोहोचत आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारी 11 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
Copyright ©2026 Bhramar