देशातील १३ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह ताशी ७० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असताना महाराष्ट्रात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे, तर मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे देशभरात पावसाचा अलर्ट असताना महाराष्ट्रात नेमकं हवामान कसं राहणार, कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे आणि हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊया.
देशाच्या विविध भागात हवामान बदलताना पाहायला मिळत आहे. कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा चटका बसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अनेक राज्यांमधून मौसमी वाऱ्यांनी माघार घेतली असली तरी,काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तसेच ४ नोव्हेंबरपर्यंत देशातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, आज १३ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसादरम्यान वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 70 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 23 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या हालचाली अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशसह पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीप परिसरात पावसाचा प्रभाव जाणवू शकतो. काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे पावसाच्या परिस्थितीत आणखी बदल होऊ शकतात. ही प्रणाली अधिक तीव्र झाल्यास काही भागांतील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.