चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्यात येईल, असे सांगून दिलासा दिला.
दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
काय झाले होते
चेंबूर येथे सिद्धार्थनगर येथील घराला पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली होती. यावेळी घरात सर्व सदस्य होते. गुप्ता परिवारातील सर्व सदस्य असून त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाला सांगण्यात आलं होतं. मात्र, अग्नीशमन दलाचे पथक येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले त्यातच गुप्ता कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता परिवाराला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. आग लागल्यानंतर सगळे घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळं त्यांना घराबाहेर पडता आलं नाही. तसंच, सर्व कुटुंब साखरझोपेत असातानाच आग लागली त्यामुळं त्यांना बाहेर पडणे कठिण झाले.
गुप्ता परिवार राहात असलेले घर हे दोन मजली होते. तळ मजल्याला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किट झाल्यामुळं आग भडकली असावी. तसंच सर्वजण झोपेत असल्यामुळं उशीर झाला व आगीने रौद्ररुप धारण केले.