राज्यातील अनेक घडामोडींना वेग आला असून अनेक मुद्द्यावरून सध्या वाद विवाद सुरु असून आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सध्या वाद सुरू आहे. या मुद्द्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप, तसेच, दावे केले जात आहेत.
दरम्यान, छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारला दिलं आहे. मात्र, त्यांच्या या मागणीनंतर वातावरण तापले आहे. आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून वाघ्या कुत्र्यावर बुलडोझर कधी चालवणार? अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे ,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
राज्य सरकारने सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवावीत सुरुवात वाघ्या कुत्र्यापासून करावी कारण इतिहासाला लागलेला कलंक आहे ज्या वाघ्या कुत्र्याचा कुठेही संदर्भ मिळत नाही तो चुकीचा पुरावा विनाकारण लोकांची दिशाभूल करायला ठेवायचा कशाला? असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे.
संभाजी ब्रिगेड मागणी करताना म्हणाले, सरकारने तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलून इतर गड किल्ल्यांवरील अतिक्रमांना प्रमाणे रायगडावरील सुद्धा वाघ्या कुत्र्याचं अतिक्रमण काढावे इतिहासाचे संदर्भ तपासावेत आणि योग्य तो निर्णय घ्यावा पण पुतळा हा सरकारनेच काढावा अशी संभाजी ब्रिगेडसह तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे.
सरकारचे काही सुपारी बहाद्दर दलाल जाणीवपूर्वक संभाजी ब्रिगेडवर अपशब्द वापरत आहेत त्यांना एवढीच विनंती की, संभाजी ब्रिगेड आग्या मोहोळ आहे. विनाकारण डिवचू नका. अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. ज्याला वाघ्या कुत्र्यावर जास्त प्रेम आहे, त्यांनी वाघ्या कुत्रा त्यांच्या आजी -आजोबा, पंजोबाच्या समाधीच्या शेजारी बसवावा. सिमेंट वाळू, विटांचा खर्च संभाजी ब्रिगेड द्यायला तयार आहे, असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे.