संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केले. पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज सकाळपासून राज्यात राजकीय विविध घडामोडी आणि ट्विस्ट पाहायला मिळाले.
यापूर्वी माध्यमांशी बोलतांना आकाश मोरे म्हणाले, होते की, मी हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते पक्षाचे प्रमुख असून वडेट्टीवार यांचेही नेतृत्व करतात. त्यामुळे ते जो निर्णय देतील, तो मला मान्य असेल. त्यानुसार त्यांनी आता अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान आकाश मोरे यांनी भावनिक वक्तव्य केलं आहे. मी जड अंतः करणाने फॉर्म मागे घ्यायला जातोय, माझ्यावर कोणताही दबाव नाही, मी निष्ठावंत कर्यकर्ता आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना थेट उत्तर देत ते म्हणाले प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्यानुसारच आम्ही करत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.