पुणे : राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू होती. अशातच आता राज्यभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारयांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आज दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. अशातच आता सुनेत्रा परावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून आजच त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यसभा उमेदवाराची घोषणा आज करण्यात येणार आहे. आजच संबंधित उमेदवाराचा उमेदवारी अर्ज देखील भरण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे यांची नावं चर्चेत होती. अखेर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे.