राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.
सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आज सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले होते. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीची गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.
छगन भुजबळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले.
त्यानुसार, शपथविधी सोहळा संध्याकाळी 5 वाजता पार पडला. मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शपथविधी सोहळा अवघ्या 10 मिनिटांत अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.