सध्या राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे महायुतीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. अनेक दिवसांपासून या निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता याबाबत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाला एकूण किती जागा हव्या आहेत, याबाबत त्यांनी सांगितले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ आज दिल्ली दौऱ्यावर होते. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली असून कांद्याचा पडलेला भाव याबाबत काहीतरी तोडगा मागावा, अशी मागणी केली. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी विधानपरिषदेच्या जागावाटपाविषयी विचारले. यावर बोलताना, जिथे आमच्या जागा जास्त आहेत, तिथे आम्हाला विधानपरिषदेच्या जागा मिळाल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. आमच्यात सकारात्मक चर्चा चालेली आहे, अशी महत्त्वाची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.
तसेच तुम्हाला एक किंवा दोन जागा दिल्या तर चालेल का? असा प्रश्न पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांन विचारला. यावर बोलताना आम्ही एकूण तीन जागा मागितलेल्या आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असे सुनेत्रा पवार यांनी सागितले. दरम्यान, महायुतीत राष्ट्रवादीला जरी 3 जागा हव्या असल्या तरी अन्य दोन पक्ष या पक्षाला फक्त एकच जागा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपा 12 जागांवर तर शिंदे गट 4 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला फक्त एकच जागा देऊ असे बोलले जात आहे.