गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेलं 'ऑपरेशन टायगर अखेर फत्ते झालं असून ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं वादळच निर्माण झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. सर्व खासदारांनी मंगळवारी रात्री दिल्लीत जाऊन नवीन गट स्थापन केला आहे. याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील मान्यता दिली आहे. यांनतर संपूर्ण राजकारणात एकच खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान आता एकनाथ शिंदेंच्या एका नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे.
या निमित्ताने 'ऑपरेशन टायगर २' फत्तं पडलं आहे. मात्र हा केवळ पिक्चर असल्याची माहिती आहे. आता शिवसेना ठाकरे गटावर 'ऑपरेशन टायगर ३' देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
खरं तर, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. हे संभाव्य फूट रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून विशेष काळजी देखील घेतली जात होती. काही बैठका देखील घेतल्या जात होत्या. मात्र ठाकरे गटाच्या सगळ्या बैठका निष्पळ ठरल्या आहेत. मंगळवारी सायंकाळनंतर राज्यातील
ऑपरेशन टायगर २ ला सुरुवात झाली.
ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. त्यांनी संसदेत वेगळा गट स्थापन केला असून शिवसेना शिंदे गटात विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १९ तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हे सर्व खासदार आपली भूमिका मांडू शकतात, असं बोललं जातंय.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची निकटवर्तीय आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठं भाकीत केलं आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार येत्या काळात पुन्हा एकदा ठाकरे गटाला भगदाड पडू शकते. खासदारानंतर आता मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाला भगदाड पडण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे नगरसेवकही त्यांची साथ सोडणार असल्याचं म्हस्के यांनी म्हटलं आहे.
खरं तर, मागील २५ वर्षे मुंबईवर शिवसेनेची सत्ता होती. आता पहिल्यांदा भाजपनं इथली सत्ता काबीज केली आहे. तरीही मुंबईत ठाकरेंना चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे. आता मुंबई महापालिकेत देखील शिवसेना ठाकरे गट फुटणार असल्याचं भाकीत नरेश म्हस्के यांनी केलं आहे. यामुळे ठाकरेंची उरली सुरली ताकदही कमी होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य पक्षफूट आता ठाकरेंकडून कशी रोखली जाते, की पुन्हा राज्यात ऑपरेशन टायगर ३ बघायला मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.