सोमवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. याच बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे.
तसेच २६ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.