राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत ते संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राज्यामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि यातच राज्यातील पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार मेहरबान झाले आहे का अशा चर्चांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणूकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे, असे असताना, राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसापुर्वी पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवाराना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, पार्थ पवारांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.