पार्थ पवारांनी घेतली कुख्यात गुंड गजानन मारणेची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ
पार्थ पवारांनी घेतली कुख्यात गुंड गजानन मारणेची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ
img
Dipali Ghadwaje
खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड गजानन मारणेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट झाल्याची चर्चा असून या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

दरम्यान, या भेटीवरून महावीकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. पुण्यातील गुन्हेगारांचा राजकीय व्यक्तिंशी जवळीक वाढली आहे. हिंदू गुंड म्हणून ओळख असलेल्या शरद मोहोळ यांची पत्नी देखील भाजपच्या पदाधिकारी आहेत. दरम्यान, गजानन उर्फ गजा मारणे हा कोथरूड येथील गुंड आहे. सध्या पुण्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहे.
 
सर्वच पक्ष कुणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी करत आहेत. दरम्यान, अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना पुन्हा मावळ लोकसभा मतदार संघातून उभे करणार अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, यामुळेच पार्थ पवार यांनी गजा मारणे याची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. या भेटी दरम्यान अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेवक दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख उपस्थित होते.

कोण आहे गजानन मारणे?

गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशी तालुक्यातील अट्टल गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी जेल मधून सुटल्यावर त्याने काढलेली मिरवणूक चर्चेचा विषय ठरली होती. मारणे हा पुण्यातील कोथरूड येथील शास्त्रीनगर येथे राहायला आहे. पुण्यात घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद असून यातुन अमोल बधे आणि पप्पू गावडे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गजा मारणे याला अटक झाली होती. तो ३ वर्षे येरवडा तुरुंगात होता. 

मात्र, सबळ पुराव्या अभावी गजा मारणे याला सोडण्यात आले होते. यानंतर त्याने जंगी मिरवणुक काढली होती. गजा मारणे याने काही दिवसांपूर्वी शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन एका व्यावसायिकाचे देखील अपहरण केले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group