मुंबई महापालिकेत एक खळबळजनक घटना घडली आहे. चक्क महापालिकेची‘तिजोरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभागृहातच चोरी झाल्याची घटना घडल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक 56 च्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या बॅगेतून 20,000 रुपये चोरी गेले आहेत. नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांनी पैसे चोरी झाल्यासंदर्भात महापौर, विरोधी पक्षनेत्या आणि स्थायी समिती अध्यक्षांकडे तक्रार देखील केली आहे.
स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर भाटिया जेवणासाठी बाहेर गेल्या होत्या, त्या परत आल्यावर पर्स उघडी असून छेडछाडीचा संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता पर्समधील 20 हजार रुपये गायब असल्याचे लक्षात आले. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने घटनेची खात्री करणे कठीण झाले आहे. या घटनेनंतर “स्थायी समिती म्हणजे महापालिकेची तिजोरी मानली जाते. याच ठिकाणी असा प्रकार होत असेल, तर सुरक्षेबद्दल काय म्हणायचं?” असा संतप्त सवाल लक्ष्मी भाटिया यांनी उपस्थित केला.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पैसे कोणी घेतले यांचा शोध लावणे कठीण असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर मी पर्स ठेवून जेवायला गेले. मात्र, आल्यावर पर्सची चैन ओपन होती, सहकारी नगरसेविकेने देखील पाहिले आहे पर्स कशा अवस्थेत होती. मी एम.एस. डिपार्टमेंटच्या मॅडमला घडलेला प्रकार सांगितले आहे. मात्र, सीसीटीव्ही नसल्याने शहानिशा झालेली नाही, असे नगरसेविका भाटि यांनी म्हटले.
सेक्युरिटी डिपार्टमेंटच्या पोलिसांना हा प्रकार सांगितला आहे, महापौर, विरोधी पक्ष, स्थायी समिती यांनाही विषय सांगितला आहे. मात्र, जर पालिकेच्या नगरसेवकांच्या पर्स सुरक्षित नाही? महिलांच्या पर्समधील पैसे घेणे कितपत योग्य? असा सवाल भाटिया यांनी उपस्थित केला. दरम्यान,या प्रकारामुळे पालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.