मायानगरी मुंबई , स्वप्न नगरी मुंबई आणि उंच उंच इमारतींचे मनोरे असलेली मुंबई . याच उंच इमारतीपैकी एक इमारत एका मुलीच्या आयुष्याचा शेवट होण्यास कारणीभूत ठरली आहे. जोगेश्वरी पूर्वेला बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगमधून सिमेंट वीट खाली पडून 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात आज सकाळी 9:30 च्या सुमारास कामासाठी जात असलेल्या 22 वर्षीय संस्कृतीच्या डोक्यावर उंच इमारतीवरुन सिमेंट ब्लॉक पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, स्थानिकांनी धावाधाव करत तिला रिक्षातून रुग्णालयात नेले, मात्र उंचीवरुन वीट पडल्याने मोठा रक्तश्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.
जोगेश्वरी पूर्वेला इमारतीचे बांधकाम सुरू होते, याच बांधकाम इमारतीमधून पांढऱ्या रंगाचा सिमेंट ब्लॉक पडून 22 वर्षीय संस्कृतीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव रुग्णालयात पाठवले आहे. दरम्यान, घटना कशामुळे घडली, यामध्ये चूक कोणाची आहे, या संदर्भात मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.