धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार केल्याची खळबळजनक घटना सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार केलाय. तिकीटावरून झालेल्या वादात प्रवाशाने थेट गोळीबार करण्यास सुरूवात केली. या घटनेमध्ये कुणालाही गोळी लागलेली नसून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे आवाज येताच प्रवाशांची मोठी धांदळ उडाली. जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करू लगला. घटना घडली तेव्हा आरोपी व्यक्तीने मद्यपान केल्याचे समजले. तो नशेत असल्याने त्याचा स्वत:वर ताबा राहिला नाही आणि त्याने हवेत गोळीबार केल्याचं, पोलिसांनी म्हटलं आहे.
हरपिंदर सिंह असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे. तो मुळचा पंजाब येथील असून सेवानिवृत्त जवान असल्याचे समजले आहे. आरोपीने आपल्या लायसन असलेल्या बंदूकीतून एक राउंड फायरींग केलीये.
टीसीने तिकीट तपासण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपी व्यक्ती आणि टीसी यांच्यात वाद झाला. वाद सुरू असताना आरोपीने टीसीवर अपशब्द देखील वापरल्याचं, काही प्रवाशांनी म्हटलंय. सियालदह राजधानी ट्रेनमध्ये के बी -८ या कोचमध्ये ही घटना घडली.
रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला कोडरमा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आलं. या व्यक्तीकडे हावडा राजधानीचं तिकीट होतं. मात्र तो सियालदह ट्रेनमधून प्रवास करत होता. त्यामुळे टीसीसोबत त्याचा वाद झाला आणि पुढे ही घटना घडली.