सीबीआयचे रेल्वे  कर्मचा-याच्या घरांवर छापे…  मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक  या ठिकाणी कारवाई
सीबीआयचे रेल्वे कर्मचा-याच्या घरांवर छापे… मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक या ठिकाणी कारवाई
img
Dipali Ghadwaje
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून देशाच्या कोनाकोपऱ्यात गाड्या जातात. दररोज हजारो प्रवासी येथून आपापल्या गंतव्य स्थानी रवाना होतात, तर अनेक जण स्वप्ननगरी मुंबईत याच ठिकाणी दाखल होतात. अशा या ख्यातनाम स्थानकाला बदनाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरो ने माजी मुख्य पार्सल पर्यवेक्षक, मुख्य यार्ड मास्टर, डेप्युटी स्टेशन मॅनेजर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस , कुर्ला, मध्य रेल्वे, मुंबईच्या पर्सल विभाग आणि यार्ड विभागातले इतर तत्कालीन दहा जण आणि काही खाजगी व्यक्तींवर पार्सल हाताळण्यात अनियमितता आणि टर्मिनसवर व्हीपीयू वॅगन्स सुविधेसंदर्भातल्या आरोपाखाली दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यासाठी यापूर्वी संयुक्त आकस्मिक तपासणी करण्यात आली होती.

रेल्वेतर्फे राबविण्यात येणाऱ्या पार्सल सेवांआडून आपल्या तुंबड्या भरणाऱ्या येथील डझनभर लाचखोर रेल्वे अधिकाऱ्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयने दोन दिवस छापे टाकून पार्सल आणि वजन विभागात होत असलेला घोटाळा उघड केला आहे.

याबाबतमिळालेली माहिती अशी की, सीबीआयच्या पथकाने सोमवार आणि मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर अचानक छापे टाकत पार्सल आणि यार्ड विभागातील अधिकाऱ्यांची लाचखोरी पकडली. यापैकी पहिल्या गुन्ह्यामध्ये सीबीआयने एकूण आठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घोटाळा काय? 
देशातील विविध शहरांत जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान भरले जाते. खासगी कंपन्यांचे लोडर रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे सामान रेल्वेमध्ये चढवितात. तीन तासांत हे काम पूर्ण करायचे असते. त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास वेळेनुसार अतिरिक्त पैसे आकारले जातात. खासगी कंपन्यांनी चढविण्यास अधिक वेळ घेऊनही त्यांच्याकडून दंडवसुली झाली नाही. त्यासाठी संबंधित कंपन्यांकडून अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे उघड झाले.

कारवाई कोणावर? 
या प्रकरणी, यार्डाचा मुख्याधिकारी प्रणय मुकुंद, यार्ड विभागाचे तीन उपस्टेशन मास्तर गिरधारी लाल सैनी, प्रदीप गौतम, जयंत मौर्या, दोन शंटिग मॅनेजर मिताई लाल यादव, राकेश करांडे, पॉइंटमन मिथिलेश कुमार, रौनित राज या आठ रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत अन्य चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

लोडरच्या जीपेवर घेतली लाच खासगी कंपन्यांना अतिरिक्त वेळ देण्यासाठी या रेल्वे अधिकाऱ्यांनी काही वेळा रोखीने लाच घेतली, तर काही प्रकरणांत लोडरच्या मोबाइलवरील जी-पेवरून लाच घेतल्याचे छापेमारीत दिसून आले. चार खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रत्येक एन्ट्रीसाठी ५०० रुपये - दुसऱ्या प्रकरणात वजन घोटाळा व वजनाची एन्ट्री करण्यासाठी पैसे घेण्याचा प्रकार या छापेमारीत उघड झाला. या प्रकरणी रेल्वेच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - रेल्वेमधून खासगी वितरक व स्वतः रेल्वे विभाग अशा दोन्ही विभागांकडून पार्सल स्वीकारले जाऊन ते पाठविले जातात. - यापैकी खासगी कंपन्यांनी जे पार्सल पाठविले, त्यांचे वजन कमी दाखविण्यासाठी व त्यामुळे कमी शुल्क आकारणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे आढळले. - पार्सल विभागाचा मुख्य अधीक्षक जे.व्ही. देशपांडे याने वर्षभरात या माध्यमातून ८ लाख रुपये गोळा केल्याचे आढळले, तर पार्सल विभागाच्या दुसऱ्या अधीक्षकाने ५ लाख १८ हजारांची लाचखोरी केल्याचे आढळले, तर या पार्सलच्या प्रत्येक एन्ट्रीसाठी अधिकारी ५०० रुपये घेत होते.
crime | CBI | railway |
इतर बातम्या
Join Whatsapp Group