महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. पुण्यातील बसमधील तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. . एका सरपंचाने गावातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. ही संतापजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं अहिल्यानगर, शिर्डी, त्र्यंबकेश्वरसह विविध ठिकाणी घेऊन जात मुलींवर अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सरपंचाला पीडित मुलींच्या आजीनेच साथ दिली आहे. आजीच्या संगनमतानेच आरोपीनं पीडित मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळल्यानंतर अखेर पीडित मुलींनी पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेला वाचा फोडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अॅस्ट्रोसिटीसह बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार आणि आजी संगिता अहिरे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. मागील काही दिवसांपासून आरोपीनं वारंवार पीडित मुलींना आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. त्याने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर आणि विटावे अशा ठिकाणी शरीरसंबध ठेवल्याचा आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपीसोबत जाण्यास जेव्हा पीडित मुलींनी नकार दिला, तेव्हा आजीने दोघींचा चावा घेत त्यांना शिवीगाळ केली. तसेच दमदाटी आणि मारहाण करत त्यांना घरात कोंडून ठेवलं. आजीसह आरोपींच्या त्रासाला कंटाळल्यानंतर अखेर चांदवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी त्यांच्यावरील आपबिती पोलिसांना सांगितली. पीडितेंची व्यथा ऐकल्यानंतर पोलीसही हादरले आहेत. पोलिसांनी अनुसुचित जाती प्रतिबंधक आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.