राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. या घटनेने त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. पीडितेच्या कुटुंबाने गर्जे आणि त्यांचे कुटुंब गौरीला त्रास देत असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणातील तपासाचे गांभीर्य आणि गंभीर आरोप पाहता, अवघ्या तीन महिन्यांत मिळालेला जामीन चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान , न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करताना स्पष्ट केले आहे की, आरोपीने या प्रकरणातील तथ्यांशी परिचित असलेल्या व्यक्तीला थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रलोभन, धमकी किंवा आश्वासन देऊ नये, जेणेकरून ते सत्य उघड करण्यापासून परावृत्त होतील. तसेच सूट मिळाल्याशिवाय सुनावणीस गैरहजर राहू नये.
जामीन अर्जातील गर्जेचा युक्तिवाद
तपास यंत्रणेसमोर आत्मसमर्पण करून सहकार्य केले आहे. त्यामुळे आणखी कोठडीची गरज नाही. तसेच एफआयआरमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठोस उल्लेख नाही.
अनंत गर्जेवर आरोप काय ?
डॉ. गौरी पालवे या केईएम रुग्णालयात दंतवैद्यक म्हणून कार्यरत होत्या. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांचा विवाह अनंत गर्जे यांच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या संसाराला ग्रहण लागले. अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे उघड झाल्याने वादाची ठिणगी पडली होती. सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा दावा गौरी यांच्या माहेरच्यांनी केला आहे. गौरी यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेतल्याचे समोर आले असले, तरी हा घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे 6 फेब्रुवारीच्या सुनावणीत पोलिसांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिप. अनंत गर्जेने स्वतः रेकॉर्ड केलेल्या 20 मिनिटांच्या क्लिपमध्ये, त्याने गौरी यांना मारहाण केल्याचे मान्य केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. जुन्या प्रेमप्रकरणाची माहिती बाहेर आल्यास जीवन संपवण्याची धमकी देऊन अनंत हा गौरींवर दबाव टाकत असल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला होता.