राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला आहे. सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे.
मनोज जरंगे यांनी सरकारनं सगे-सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करून गुंड शाही आणि दडपशी सुरू केली आहे. त्यामुळे कोट्यवधी मराठा समाज पुन्हा एकवटणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे.
मराठा समाजाने दानवेंसह, कुचेंना माघारी पाठवलं
ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना जालन्यात मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील एका गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे आले असता, त्यांना मराठा तरुणांनी थेट गाडीतूनच माघारी पाठवलं आहे.