बीड : शिवसेना(उबाठा)गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना बीड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच ठाकरे गटामध्ये गळती सुरूच आहे. बीडमध्ये ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. आज शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी बीडमधून ५०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बीडमधून मोठं खिंडार पडले आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे आपल्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिकांसह शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. आज रात्री (९, जानेवारी) 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याल बीडमधून तब्बल 500 गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.
बीड ते मुंबई या रॅलीमध्ये हजारो शिवसैनिक सहभागी झाले आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटांमध्ये मोठी अस्वस्थता असल्याचं मागच्या काही दिवसात जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडून, शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. याआधी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले व्यकटेश शिंदे, राजा पांडे, संतोष चौधरी, विजय राठोड, कृष्णा सुरवसे, मोहन राजमाने, नागेश मुरकुटे यासह ५३ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.