बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. दरम्यान, सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून तपास सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच , मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं योग्य नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधकांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “पोलिसांनी या घटनेबाबतची सर्व माहिती दिली आहे. या पाठीमागे कशाप्रकारचा मोटीव असू शकतो, हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आरोपी कुठून आला हे देखील पोलिसांनी सांगितलं आहे. आता पूर्ण कारवाई सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“मला असं वाटतं की देशातील मेगासिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की, कधीकधी काही घटना घडतात. त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं योग्य होणार नाही. याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण मुंबई अधिक सुरक्षित राहायला पाहिजे या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.