बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला.या प्रकरणाने संपूर्ण बॉलीवूड देशभरात एकच खळबळ निर्माण झाली. 16 जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानच्या राहत्या घरी ही घटना घडली. दरम्यान, हल्ला झाल्यानंतर त्याला रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. कोट्यधीश असलेल्या सैफला सर्वसामान्य रिक्षावाल्याने रुग्णालयात नेलं. सैफसारख्या नवाबाला रुग्णालयात नेलं म्हणजे रिक्षावाल्याला भरपूर पैसे मिळाले असतील असं सर्वांना वाटलं होतं. पण रिक्षावाल्याने त्याक्षणी कोणतेही पैसे आकारले नाही. सैफसाठी माणूसकी दाखवणाऱ्या रिक्षावाल्याला हल्ल्याच्या 4 दिवसांनी मोठं बक्षीस देण्यात आलं आहे.
ऑटो-रिक्षा चालक भजन सिंग याने अभिनेता सैफ अली खानवर ज्या रात्री हल्ला झाला त्या रात्री त्याला त्वरेने लीलावती रुग्णालयात नेले, ज्यामुळे त्याला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले. ऑटो-रिक्षा चालक भजन सिंग यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, “मला तिथे (वांद्रे पोलीस स्टेशन) चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मी त्या रात्री पैशांचा विचार केला नाही. आतापर्यंत माझ्याशी करीना कपूर किंवा इतर कोणीही संपर्क केलेला नाही. माझे त्यांच्याशी कोणतेही संभाषण झाले नाही."
दरम्यान, " सैफ अली खानला माणूसकी दाखवणाऱ्या ऑटो-रिक्षा चालक भजन सिंग याला 11,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. खान किंवा कपूर कुटुंबाकडून नाही तर एका संस्थेकडून ऑटो रिक्षा चालकाला 11,000 रुपयांचे इनाम देण्यात आलाय. इनाम देऊन संस्थेने रिक्षा चालकाचं कौतूक केलं आहे.