मुंबई :- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली.
सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात दरोडेखोर शिरला होता. त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
सध्या त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सैफच्या हातावर 6 वार केल्याचे समजते आहे. आरोपीच्या शोधासाठी, पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
नेमकं काय घडलं
हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान हा कुटुंबियांसोबत घरी झोपला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक चोर सैफच्या घरात घुसला. त्याचवेळी घरातील काही नोकरांना हालचालीमुळे जाग आली, चोराला पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने सैफही झोपेतून जागा झाला, तो लागलीच बाहेर आला.
समोर चोर पाहून सैफने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोघांमध्ये बरीच झटापट झाली. त्याचदरम्यान चोराने सैफवर चाकूने हल्ला केला, त्यामध्ये सैफ जखमी झाला. कुटुंबीय आणि घरातील नोकर-चाकर तातडीने सैफला लीलावती रुग्णालयात घेऊन गेले, तेथे त्याच्यावर सध्या सर्जरी सुरू आहेत.
त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असून सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या आणि सुरक्षेचे काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहे.