भारतातच नाही तर जगभरात कॅन्सरने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आता रशियाने कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी दिलीय. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविरोधात मोठे यश मिळवल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, कर्करोगावर उपचारासाठी त्यांनी एक प्रभावी लस विकसित केली आहे. 2025 च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध होईल, आणि विशेष म्हणजे रशियामध्ये सर्व कर्करोगग्रस्त रुग्णांना ही लस मोफत दिली जाणार आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे काप्रिन यांनी ही माहिती दिलीय. 2025 च्या सुरुवातीला कॅन्सरवर मात करणारी ही लस दिली जाईल.. रशिया आपल्या नागरिकांना ही कॅन्सरवर मात करणारी लस मोफत देणार आहे. मात्र ट्युमरची निर्मिती रोखण्यासाठी याचा वापर केला जाणार नाही. ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा रशिया त्याची अंमलबजावणी कशी करेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
त्याचबरोबर या लसीचं नावही अद्याप समोर आलेलं नाही. डायरेक्टर आंद्रे काप्रिन म्हणाले की, रशियाने कॅन्सरवर मात करणारी mRNA लस तयार केली आहे. रशियाच्या या संशोधनामुळे कोट्यवधि कॅन्सर रूग्णांना दिलासा मिळणार आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ट्यूमरची वाढ रोखण्यापासून मदत होईल, हे समोर आलेय.