जेट एअरवेजचे संस्थापक आणि जामिनावर बाहेर असलेले नरेश गोयल यांच्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले. त्यामुळे नरेश गोयल यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजता अनिता गोयल यांनी अखेरचा श्वास घेतला. आजारी पत्नीसोबत राहण्यासाठी नरेश गोयल यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यामुळे त्यांना सशर्त जामीन देण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना निधन झाले. या महिन्याच्या सुरुवातीला नरेश गोयल यांनी त्यांच्या पत्नीसोबत राहण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मागितला होता. आधी कॅन्सर, नंतर तुरुंगवास आणि आता मोठ्या कष्टाने त्यांना जामीन मिळाला होता आणि आता पत्नीच्या निधनामुळे नरेश गोयल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल हे दोघेही कर्करोगाने ग्रस्त असल्याने वैद्यकीय आणि मानवी दृष्टीकोनाच्या आधारावर त्यांनी अंतरिम जामीन मागितला होता. फेब्रुवारीमध्ये, विशेष न्यायालयाने गोयल यांना जामीन नाकारला होता परंतु त्यांना त्यांच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली होती.
अनिता गोयल यांचा जेट एअरवेजच्या कामकाजात सहभाग होता आणि त्या कार्यकारी उपाध्यक्ष होत्या. 2015 पासून त्या संचालक मंडळाचा भाग होत्या. 6 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव 2 महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.
गोयल यांना सप्टेंबर 2023 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने कॅनरा बँकेकडून जेट एअरवेजला मिळालेल्या 538.62 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नीला नोव्हेंबर 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, अनिता गोयल यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने त्यांना त्याच दिवशी जामीन मंजूर केला.
मुंबई उच्च न्यायालयाने गोयल यांना अंतरिम जामिनासाठी एक लाख रुपयांचा जातमुचलक भरावा आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडू नये असे आदेश दिले होते. गोयल यांनी वैद्यकीय आणि मानवतावादी आधारावर अंतरिम जामीन मागितला होता कारण ते आणि त्यांची पत्नी अनिता गोयल दोघेही कर्करोगाने ग्रस्त आहेत.