अॅमवे इंडिया या डायरेक्ट सेलिंग फर्मवर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. कंपनीविरुद्ध हैदराबादच्या विशेष न्यायालयात 4,050 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तेलंगणा पोलिसांकडे यापूर्वीही कंपनीविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ईडी आणि कंपनीच्या संचालकांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी चौकशी करत आहे.
काय आहे आरोप?
अंमलबजावणी संचालनालयाने अॅमवे इंडियावर आरोप केला आहे की कंपनीकडून 'मनी सर्कुलेशन स्कीम'चा प्रचार बेकायदेशीरपणे केला जात आहे. ही योजना पिरॅमिड योजना असल्याचे तपासात समोर आले आहे. ज्यामध्ये वरच्या श्रेणीत असलेल्या लोकांना मोठा फायदा होतो.
Amway India लोकांची फसवणूक करत आहे
कंपनी माल विक्रीच्या नावाखाली नावनोंदणी करून जास्त कमिशनचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या योजनेत जितके नवीन सदस्य सामील होतील तितके वरच्या लोकांना अधिक कमिशन मिळेल.
कमिशनची कमाई 4050.21 कोटी रुपये
केवळ 'मनी सर्क्युलेशन स्कीम'द्वारे अॅमवेने 4050.21 कोटी रुपये कमावल्याचेही तपासात समोर आले आहे. एवढेच नाही तर परदेशात बसलेल्या गुंतवणूकदारांना कंपनीने 2,859 कोटी रुपये पाठवले.
त्यानंतरच ही कंपनी अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आली. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. 757.77 कोटी रुपयांची किंमत असलेल्या कंपनीच्या मालमत्तेचाही या प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.