RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरणानंतर सांगितले की, UPI द्वारे पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. पण हे व्यवहार फक्त शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलमध्ये करता येतील.
नोव्हेंबर 2023 मध्ये UPI व्यवहारांनी 17.4 लाख कोटी रुपयांचा नवा विक्रम केला होता. 2022 च्या तुलनेत, UPI द्वारे व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत 54 टक्के आणि मूल्याच्या बाबतीत 46 टक्के वाढ झाली आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, टक्केवारीच्या बाबतीत व्यवहारांचे मूल्य महिन्याला 1.45 टक्क्यांनी वाढले आहे. सणासुदीच्या हंगामामुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये व्यवहारांचे मूल्य 8.6% वाढले आणि व्यवहारांची संख्या 8.1% वाढली होती.
महागाईचा दर 4 टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महागाईबाबत चिंता व्यक्त करत महागाईचा दर सौम्य असला तरी अन्नधान्य महागाई दरात झालेली वाढ चिंताजनक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आतापर्यंत आपण गाठू शकलो नाही. त्यासाठी काम करत राहावे लागेल. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर 5.6 टक्के राहण्याची शक्यता आहे.