नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत संयुक्तपणे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूनिफाईड पेमेंट इंटरफेस सेवांचे आणि मॉरिशसमधील रुपे कार्ड सेवांचं ऑनलाईन उद्घाटन केलं. यामुळे आता श्रीलंका आणि मॉरिशसमधील लोकही UPI द्वारे पेमेंट करू शकतील. दुपारी 1 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला.
यामध्ये पीएम मोदींसोबत श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासह तिन्ही देशांचे सेंट्रल बँकेचे गव्हर्नरही उपस्थित होते. RBI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली.
को-ब्रँडेड रुपे कार्ड हे मॉरिशसमध्ये स्थानिक कार्ड म्हणून निर्देशित केले जाईल, असं मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी सांगितलं. दरम्यान शुभारंभामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले.
यावेळी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत, श्रीलंका आणि मॉरिशस या तीन मित्र राष्ट्रांसाठी आजचा दिवस विशेष आहे. ज्यावेळी त्यांचे ऐतिहासिक संबंध आधुनिक डिजिटल संबंधांचे रूप घेत आहेत. लोकांच्या विकासाप्रति असलेल्या सरकारच्या बांधिलकीचा हा पुरावा आहे, असं त्यांनी सांगितलं. फिनटेक संपर्कव्यवस्था सीमेपलीकडील व्यवहार आणि संबंधाना अधिक बळकटी देईल, असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं आहे.
भारताचे यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच, यूपीआय आता एक नवी जबाबदारी पार पाडत आहे. भारतासोबत भागीदार जोडत आहे.", यावर पंतप्रधानांनी भर दिला.
यावेळी युपीआय व्यवहारांची सोय आणि वेग याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, युपीआयचा वापर करून गेल्या वर्षभरात 2 लाख कोटी रुपये मूल्याचं म्हणजेच, श्रीलंकेचे 8 ट्रिलीयन रुपये किंवा मॉरीशसचे 1 ट्रिलीयन रुपये इतक्या मूल्याचे 100 दशलक्षांहून अधिक व्यवहार करण्यात आले.
बँक खाती, आधार कार्ड आणि मोबाईल फोन यांच्या जेम त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक माणसापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवल्याचा उल्लेख करत लाभार्थ्यांच्या खात्यात 34 लाख कोटी रुपये म्हणजेच 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स हस्तांतरित केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
श्रीलंका आणि मॉरीशस युपीआय सेवांशी जोडले जाणार
श्रीलंका आणि मॉरीशस या देशांनी युपीआय व्यवस्थेशी जोडून घेतल्यामुळे त्यांना लाभ होईल आणि त्यांच्या डिजिटल कायापालटाला चालना मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थांमध्ये सकारात्मक बदल घडून येतील तसेच पर्यटनाला चालना मिळेल याबाबत पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला.
“युपीआय सुविधा असलेल्या पर्यटनस्थळांना भारतीय पर्यटक प्राधान्य देतील असा मला विश्वास वाटतो. श्रीलंका आणि मॉरीशस मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना तसेच तेथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या प्रणालीचा विशेष लाभ होईल,” ते पुढे म्हणाले.नेपाळ, भूतान, सिंगापूर, आणि आखाती देशांपैकी संयुक्त अरब अमिरात या देशानंतर आता आफ्रिकेत मॉरीशस रुपे कार्डाचे परिचालन सुरु होत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे भारतातून मॉरीशसला येणाऱ्या लोकांची चांगली सोय होईल.स्थानिक चलनातील नोटा तसेच नाणी विकत घेण्याची गरज कमी होईल. युपीआय तसेच रूपे कार्ड या प्रणालींमुळे वास्तव वेळेत, किफायतशीर आणि अत्यंत सुलभतेने आपल्या स्वतःच्या चलनात आपल्याला पैसे भरता येतील. येत्या काळात आपण सीमापार पैसे पाठवण्याचे व्यवहार पी2पी म्हणजे दोन व्यक्तींमध्ये थेट व्यवहार सुविधेच्या स्वरुपात करण्याच्या दिशेने लवकरच वाटचाल करू.