स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जवळपास पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अनेक वेगवेगळे टप्पे पार करत ही मालिका आता शेवटाला आली आहे.
दरम्यान मालिकेतील कलाकारांच्या भावनिक प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत. अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. त्यानंतर आता आई म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्टार प्रवाह लवकरच निवेदिता सराफ यांची आई बाबा रिटायर होत आहेत, ही मलिका येत्या 2 डिसेंबर पासून सुरु होत आहे. त्यामुळे आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. नुकतच या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अरुंधतीच्या प्रवासाविषयी अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या आहेत.
'आता भावनाविविश व्हायला होतं..'
अरुंधतीच्या प्रवसाविषयी बोलताना मधुराणीने म्हटलं की, 'हा खूपच मोठा प्रवास होता. सुरुवातीला असं खरंच वाटलं नव्हतं की, लोकांचं एवढं प्रेम मिळणाऱ्या प्रोजेक्टचा आपण भाग होत आहोत.. आता आपण म्हणतोय पाच वर्ष पण ही पाच वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. इतका अरुंधतीचा प्रवास केलाय, वेगवेगळे सीन्स शूट केले, इतके पदर त्या भूमिकेचे केलेत की आता भावनाविविश व्हायला होतं.
तुम्ही अरुंधतीवर, आई कुठे काय करतेवर खूप प्रेम केलंत. या मालिकेनेही मला खूप दिलं. जेवढं आमचे या टीमचे कष्ट आहेत, त्या कष्टांना तुम्ही उचलून धरलंत. रसिक मायबाप प्रेक्षकांची मी मनापासून आभारी आहे.. ही मालिका जरी संपली तरी ते प्रेम आणि अरुंधती कायमच माझ्यासोबत राहणार आहे...'
पुढे तिने म्हटलं की,'आपल्या खांद्यावर ही मालिका चालणार आहे, अशी अजिबात कोणतीही भावना नव्हती. मज्जा करायची आहे, छान फॅमिली आहे, खूप वर्षांनी काम करतोय एवढीच भावना होती, आजही तिच भावना आहे जी माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. या लोकांसोबत निर्माण झालेला चांगला बंध, एक चांगली भूमिका निभावल्याचं समाधान, चिरकाल लोकांच्या लक्षात राहिल अशा प्रोजेक्टचा भाग आहोत याचं खूप जास्त समाधान आहे.'