मृण्मयी आणि गौतमी देशपांडे यांचे आजोबा मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीसोबत त्यांनी 'माझा होशीन ना' या मालिकेत काम केलं होतं. आता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. आजोबांच्या निधनानंतर गौतमीने 'तीन अंकी नाटक इथेच संपलं', असं म्हणत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
गौतमी आणि मृण्मयी यांचे आजोबा अरविंद काणे यांनी 1953 पासून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. गौतमी आणि मृण्मयीसोबत आजोबांचं अत्यंत जवळचं नातं होतं. त्यामुळे आता आजोबांच्या निधनानंतर गौतमीने भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
काय आहे गौतमी देशपांडेची पोस्ट?
आजोबांचा फोटो शेअर करत गौतमीने लिहिलं आहे,"प्रिय आजोबा...पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला. आज माझ्या आजोबांची, आईच्या मामा बाबांची, आजीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळ्या भूमिका असलेलं तुमचं तीन अंकी नाटक इथेच संपलं. पण आजोबा काय सांगू तुम्हाला..इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपलं तुम्ही..कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं. दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं 'तो मी नव्हेच' म्हणत राहीलात .. असे आयुष्याचे खरे खुरे 'किमयागार' ठरलात . 'चाणक्य' बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात. तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही".
गौतमीने पुढे लिहिलं आहे,"प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो. यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन् काय नको असं वाटतंय. त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारे आयुष्यभर. तुम्ही आता मात्र शांत व्हा..दमला असाल तुम्ही..खऱ्या अर्थाने पडदा पडला आहे. नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे. तुमच्यातला हा नट आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू. तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य..झालेत बहू, असतील बहू, होतील बहू पण या सम हा..रंगदेवतेचा वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते..अन् त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते".