शिक्षिकेचा कारनामा !  स्वतः गैरहजर राहून केलं असं काम, नेमकं काय घडलं ?
शिक्षिकेचा कारनामा ! स्वतः गैरहजर राहून केलं असं काम, नेमकं काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
पुणे मधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. येथील एका शाळेतील शिक्षिकेने असा काही कारनामा केला आहे की, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि सुरक्षितेतचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यातील भोर नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक १ मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील उपशिक्षिका भारती दीपक मोरे यांनी शाळेत स्वत: गैरहजर राहून स्वतःऐवजी दुसऱ्या महिलेला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ठेवल्याचा प्रताप समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकारामुळे मुख्याधिकाऱ्यांनी भारती मोरे यांना निलंबित केले आहे.

भारती दीपक मोरे असे निलंबित करण्यात आलेल्या उपशिक्षिकेचे नाव आहे. नगरपालिका मुख्याधिकारी गजानन शिंदे आणि प्रशासन अधिकारी राजकुमार बामणे यांनी याबाबतचे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या घटनेची माहिती मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे पोहोचली होती. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी दुपारी शाळेला अचानक भेट दिली. त्यावेळी शिक्षिका भारती मोरे शाळेत गैरहजर होत्या. पण शाळेतील हजेरी रजिस्टरवर त्यांची सही आढळली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्याऐवजी दुसरीच एक महिला वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणाचा अधिक तपास केला असता हा सर्व प्रकार समोर आला. भारती मोरे यांनी त्या अज्ञात महिलेला काही ठराविक रक्कम देऊन शिकवण्यासाठी ठेवले होते. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ भारती मोरे यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. भारती मोरे यांनी खुलासा सादर केला. मात्र त्यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने तो अमान्य करण्यात आला. त्यांच्या खुलाशात गैरहजर राहण्याबाबत आणि दुसऱ्या व्यक्तीला वर्गाचा ताबा देण्याबाबत योग्य उल्लेख नव्हता.

भारती मोरे यांचे निलंबन कायम राहणार
त्यामुळे, भारती मोरे यांच्यावर विनापरवानगी गैरहजर राहणे, मुख्यालयाची परवानगी न घेता गैरहजर राहणे, आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा करणे, गैरहजर असताना खासगी व्यक्तीला वर्गाचा ताबा देणे, वर्ग उघडे ठेवून त्याच्या चाव्या तिसऱ्या व्यक्तीकडे देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत अडथळा निर्माण करणे या गंभीर कारणांमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्यासह तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत भारती मोरे यांचे निलंबन कायम राहणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group