क्रिकेटपटू मयंक अग्रवाल आयसीयुमध्ये दाखल
क्रिकेटपटू मयंक अग्रवाल आयसीयुमध्ये दाखल
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली  : भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवाल विमानात आजारी पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या आजाराबद्दल खळबळजनक खुलासा समोर आला आहे. 

आगरतळा येथे रणजी ट्रॉफी सामना खेळून झाल्यावर कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल आपल्या संघासोबत परत येत होता. मात्र काल विमानात चढताच तो आजारी पडला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या तो आयसीयूमध्ये आहे. 

पाणी समजून चुकून विषारी द्रव प्यायल्याचे मयंकने सांगितले असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हा द्रवपदार्थ त्याच्या सीटवर ठेवला होता, असेही मयंकने सांगितले. या घटनेनंतर मयंकच्या वतीने आगरतळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्रिपुरा संघाविरुद्ध सामना जिंकल्यानंतर कर्नाटकचा संघ काल इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने दिल्लीमार्गे सुरतला रवाना झाला, जिथे त्याचा पुढील सामना रेल्वेच्या संघाशी होणार आहे. कर्नाटकचे सर्व खेळाडू विमानात बसले होते. मात्र अचानक मयंकची तब्येत बिघडली. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मयंक अग्रवाल हा विमानातील एका पाऊचमधील काहीतरी द्रवपदार्थ प्यायला, मात्र त्यानंतर त्याला तोंडात जळजळ जाणवू लागली. त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला लगेच खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या मयंकची प्रकृती धोक्याबाहेर असून तो स्थिर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याचा कसून तपास करण्यात येईल, असे त्रिपुराच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक स्टेट क्रिकेट एसोसिएशनच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, आज मयंक बंगळुरू येथे परतू शकतो. कर्नाटकचा पुढचा सामना 2 फेब्रुवारीला रेल्वेविरुद्ध होणार आहे. मात्र मयंकची तब्येत बिघडल्याने पुढील सामना खेळेल की नाही याबाबत आता साशंकता आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group