वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जगज्जेते होण्याचा मान मिळवला. भेदक गोलंदाजीने भारताला २४० धावांवर रोखल्यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारुंनी ६ विकेट्स राखून भारतावर विजय साकारला आणि घरच्या मैदानात होत असलेल्या या अंतिम सामन्यात विजय मिळवण्याच्या टीम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
भारतासारख्या मजबूत संघाला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकल्याने ऑस्ट्रेलियन संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शचा एक वादग्रस्त फोटो समोर आला असून क्रिकेट चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग होणं, हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार झाल्यानंतर खेळाडू या ट्रॉफीसोबत फोटोसेशन करतात. तसंच काही खेळाडू तर ट्रॉफीचं चुंबन घेत आपला आनंद साजरा करतात.
काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शचा ट्रॉफीसोबतचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं खरं, पण या जेतेपदाची त्यांना खरंच किंमत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याला कारण ठरलाय ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधला एक फोटो. हा फोटो खुद्द ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्शच्या एका कृतीमुळे याला उन्माद म्हणावं की मस्ती? असा प्रश्न क्रिकेट चाहते उपस्थित करू लागले आहेत. मार्शच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मिशेल मार्शची ही कृती उन्मत्त असल्याची टीका क्रिकेट चाहते करत आहेत.