टी-२० वर्ल्ड कप १७ वर्षांनी जिंकून टीम इंडिया भारतात परतणार आहे. भारताने प्रथमच रोहितच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्ड कप जिंकला असून इतिहास रचला आहे. पूर्ण वर्ल्ड कपमध्ये भारताने दमदार कामगिरी सादर केली. विश्वविजेती टीम इंडिया संघ आता लवकरच भारतात परतणार असून बार्बाडोसहून निघालेला
भारतीय संघ गुरुवारी सकाळी भारतामध्ये दाखल होणार आहे.
टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचं वेळापत्रक
गुरुवारी सकाळी भारतीय संघ नवी दिल्लीच्या विमानतळावर दाखल होईल. तिथे त्यांचं जोरदार स्वागत केलं जाईल. चाहत्यांनी नवी दिल्लीचे विमानतळ दुमदुमलेलं असेल. भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत झाल्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी निघतील. यावेळी भारतीय संघासाठी एक खास बस करण्यात येणार असल्याचं समजतं आहे. या बसमध्ये सर्व खेळाडू असतील, तर त्यांच्या कुटुंबियांची व्यवस्था वेगळी करण्यात येणार आहे. भारतीय संघ सकाळी ११.०० वाजता पंतप्रधान यांनी भेट घेतील.
भारतीय संघ यावेळी मोदी यांची भेट घेतील. मोदी यावेळी संघाला संबोधित करतील. त्याचबरोबर खेळाडूंशी संवाद साधतील. खेळाडूंच्या चहापानाची सोय येथेच करण्यात आलेली असेल. मोदी यांच्याशी भेट झाल्यावर भारतीय संघ मुंबईला जाण्यासाठी निघणार आहे. भारतीय संघ दुपारी १.०० वाजता दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी विमानात बसेल. साधारण २ दोन तासात ते मुंबईला पोहोचतील. मुंबईच्या विमानतळावरून ते नरीमन पॉइंटला पोहोचतील. त्यानंतर नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम ते खास बसने प्रवास करतील. ही बस २००७ सारखीच छत नसलेली असेल. त्यानंतर तिथून ते थेट वानखेडे स्टेडियमवर जातील.
वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने भारताच्या खेळाडूंसाठी एक खास कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमात भारताच्या खेळाडूंचा खास सत्कार होईल आणि त्यानंतर भारतीय संघाला बीसीसीआयने जाहीर केलेली रक्कम देण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयचे पदाधिकारी त्याचबरोबर भारताच्या माजी खेळाडूंनाही यावेळी आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे वानखेडेवर हा सोहळा चांगलाच रंगतदार होणार असल्याचे समजते आहे.