टी-20 वर्ल्ड कप संपताच मॅच फिक्सिंगचे मोठे प्रकरण समोर, 3 खेळाडूंवर ICCची मोठी कारवाई
टी-20 वर्ल्ड कप संपताच मॅच फिक्सिंगचे मोठे प्रकरण समोर, 3 खेळाडूंवर ICCची मोठी कारवाई
img
वैष्णवी सांगळे
टी-20 वर्ल्डकप 2026 संपताच क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वेस्टइंडीज क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचे मोठे प्रकरण समोर आले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) बार्बाडोस येथे आयोजित Bim10 लीग 2023/24 दरम्यान झालेल्या कथित मॅच फिक्सिंग प्रकरणात वेस्ट इंडिजचा खेळाडू जीवोर्न सील्ससह तिघांना निलंबित केले आहे. 

आयसीसीने कठोर भूमिका घेत जीवोर्न सील्स, ट्रेव्हॉन ग्रिफिथ आणि चित्रंजन राठोड यांना तात्काळ प्रभावाने क्रिकेटशी संबंधित सर्व प्रकारच्या उपक्रमांमधून निलंबित केले आहे. 11 मार्च 2026 पासून पुढील 14 दिवसांच्या आत या तिघांना आरोपांवर आपले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही कारवाई ICC च्या व्यापक तपासाचा भाग असून, याच तपासात जानेवारी महिन्यात अमेरिकेचा खेळाडू ॲरॉन जोन्स याच्यावरही कारवाई करण्यात आली होती.

आयसीसीने वेस्टइंडीजचा खेळाडू जीवोर्न सील्स टीम अधिकारी ट्रेव्हॉन ग्रिफिथ आणि टायटन्स संघाचे मालक चित्रंजन राठोड यांच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप ठेवले आहेत. Bim10 स्पर्धेतील सामन्यांचे निकाल तसेच खेळातील घडामोडींवर गैरमार्गाने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय, इतर खेळाडूंना भ्रष्टाचारासाठी प्रवृत्त करणे आणि अँटी-करप्शन अधिकाऱ्यांच्या तपासात सहकार्य न करणे असेही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

बार्बाडोस येथे झालेल्या Bim10 स्पर्धेत टायटन्स संघाचे अधिकारी असलेल्या ट्रेव्हॉन ग्रिफिथ यांच्यावर क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) कोडसोबतच ICC च्या आंतरराष्ट्रीय अँटी-करप्शन कोडचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तपासाशी संबंधित महत्त्वाची माहिती लपवण्याचा किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच जीवोर्न सील्स आणि ग्रिफिथ या दोघांनीही त्यांना देण्यात आलेल्या मॅच फिक्सिंगच्या ऑफरची माहिती अधिकाऱ्यांना न दिल्याचेही समोर आले आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group