पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात ; चार महिलांचा मृत्यू, सहा जखमी
पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात ; चार महिलांचा मृत्यू, सहा जखमी
img
Dipali Ghadwaje
सोलापूर : देवदर्शनासाठी तुळजापूरकडे जात असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या मोहोळजवळील यावली गावानजीक झाला असून या अपघातात माल ट्रक व कारच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार , बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील सर्वजण तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. आदमअली मुनावरअली शेख (वय ३७ ), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलाबाई मारूती वेताळ (वय ६० रा. रांजनगाव मशीद ता. पारनेर) अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला. द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४० रा. राजंनगाव मशीद) अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यांना सोलापूरच्या सिविहील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

दरम्यान ट्रक आणि कारच्या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहे. सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बळी बाबू पवार (वय २७), छकुली भीमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७ वर्ष), मंदाबाई नाथा पवार (वय ५२), सुरेखा भारत मोरे (वय ४५), बायजाबाई रामदास पवार (वय ६०, सर्व रा. राजंनगाव,जि अहमदनगर ) अशी जखमींची नावे आहेत. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विविध वॉर्डात जखमींवर उपचार सुरू आहेत. मोहोळ पोलीस ठाण्यातील टोलनाक्याचे पेट्रोलिंग ऑफिसर मलिकार्जुन बळीराम बजुलगे यांनी अपघाताची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव (ता. पारनेर जिल्हा अहमदनगर) येथील महिला भाविक कारमधून तुळजापूरला दर्शनासाठी चालल्या होत्या. या कारने यावली गावच्या परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरकडे जाणाऱ्या मालट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. अपघातात तीन महिला भाविक जागीच ठार झाल्या. एका महिला भाविकाचा सोलापूर सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती मोहोळ पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. अपघातात मृत पावलेल्या भाविक पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group