दिवाळी म्हटलं की आठवतो तो दिवाळीचा फराळ. आणि मिळणारी सुट्टी. आता सुट्टी म्हटलं कि कुठे तरी फिरायला जायचा प्लॅन अनेक जण करत असतात. पण प्रायव्हेट कंपनीच्या वाहनातून प्रवास करणं तुलनेनं खर्चिक ठरतं. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही लांबचा फिरण्याचा प्लॅन कॅन्सल करतात आणि जवळचंच एखादं ठिकाण बघतात.

पण आता आपल्याला तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे, आणि इतर प्रेक्षणीय स्थळे कमी पैशात पहायचे असतील तर, एसटीतूनही आपण प्रवास करू शकता. कारण दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांना मनसोक्त फिरण्यासाठी एसटी महामंडळाने पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. एसटी महामंडळाने एसटीच्या भाडेदरात कपात केली आहे. किमान २२५ ते कमाल १ हजार २५४ रूपयांपर्यंत मोठी कपात केली आहे.
एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली होती. जानेवारी महिन्यात १५ टक्के भाडेवाढ करण्यात आले होते. दरम्यान, दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीसाठी १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचाही निर्णय महामंडळातर्फे घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील पुरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केलीय. आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत प्रवाशांना कमी दरात फिरता येणार आहे.
प्रोढ तसेच लहान मुलांसाठी ४ आणि ७ दिवस अशा स्वरूपात पास मिळेल. महामंडळातील एसटी रातराणी, शिवशाही, ई- शिवाई, शिवनेरी अशा बसेसमध्ये या योजनेतून मिळणारे पास ग्राह्य धरले जाईल. या पासद्वारे प्रवाशांना अमर्यादित प्रवास करता येईल.
आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत भाडेदर
साधी बस
४ दिवस (प्रौढ) - जुने दर (१,८१४), नवे दर (१,३६४).
४ दिवस (मुले) - जुने दर (९१०), नवे दर (६८५).
७ दिवस (प्रौढ) - जुने दर (३,१७१), नवे दर (२,३८२).
७ दिवस (मुले) - जुने दर (१,५८८), नवे दर (१,१९४).
शिवशाही
४ दिवस (प्रौढ) - जुने दर (२,५३३), नवे दर (१,८१८).
४ दिवस (मुले) - जुने दर (१,२६१), नवे दर (९११).
७ दिवस (प्रौढ) - जुने दर (४,४२९), नवे दर (३,१७५).
७ दिवस (मुले) - जुने दर (२,२१७), नवे दर (१,५९०).