नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवली आहे. ७० जागांपैकी भाजप तब्बल ४७ जागांवर आघाडीवर आहे, तर सत्ताधारी आपला फक्त २३ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. केजरीवाल यांच्या दहा वर्षाच्या सत्तेला धक्का मिळाला असून मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांना ही पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या मनिष सिसोदीया हे ही पराभूत झाले. मात्र विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी मात्र काठावर विजय मिळवला. या पराभवानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य केला आहे. जनतेचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे. दिल्लीत आप सरकारने वीज, शिक्षण, पाणी क्षेत्रात चांगले काम केले. दिल्लीतल्या लोकांना चांगल्या सुविधा दिल्या. दिल्लीत चांगल्या पायाभूत सुविधा उभारल्या. दिल्लीकरांचे जिवन सुकर होण्यासाठी प्रयत्न केला.
आता या पुढे एक भक्कम विरोधीपक्ष म्हणून काम करणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. दिल्लीच्या जनतेने जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य असल्याचं ही ते म्हणाले.
या पुढच्या काळात जनतेसाठी काम करत राहाणार असल्याचे केजरीवाल म्हणाले. आम्ही राजकारणात सत्तेसाठी कधीच आलो नव्हतो. सत्ता एक साधन होती, ज्या माध्यमातून आम्हाला जनतेची सेवा करायची होती. त्यांच्या सुख दुखात आम्ही सहभागी होवू शकलो.
आता या पुढेही जनतेसाठी काम करू. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढले. त्यांना शुभेच्छा देतो असंही ते म्हणाले. कार्यकर्त्यांना भरपूर काही सहन करावं लागलं असंही ते म्हणाले.