दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लश्कर-ए-तोयबा (LeT) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शब्बीर अहमद लोन असं त्याचं नाव आहे. मेट्रो पोस्टर प्रकरणात नुकतीच अटक करण्यात आलेल्या मॉड्यूलचा तो सूत्रधार होता. माहितीनुसार, दहशतवादी शब्बीर अहमद लोन हा संपूर्ण मॉड्यूल चालवत होता आणि मेट्रो पोस्टर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींशी त्याचा थेट संपर्क होता. या कटाचं जाळं आणि इतर पैलूंचा तपास करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.
दरम्यान, राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत चातुर्याने उधळून लावला आहे. शब्बीर अहमद हा साधा दहशतवादी नसून, तो बांगलादेशातून भारतातील दहशतवादी हालचालींचे नियंत्रण करत होता. या अटकेमुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI कशा प्रकारे भारतीय सीमांच्या बाहेरून कट रचत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
दिल्ली पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी शब्बीर अहमद लोन याच्या निशाण्यावर दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला आणि अत्यंत गर्दीची मेट्रो स्थानके होती. राजधानीत मोठी जीवितहानी आणि दहशत निर्माण करण्याचा त्याचा क्रूर मनसुबा पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे.
काही दिवसांपूर्वी मेट्रो परिसरात दहशतवादी पोस्टर्स लावून खळबळ माजवणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार शब्बीरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. शब्बीर हा भारतात नसून बांगलादेशात बसून 'एनक्रिप्टेड ॲप्स'च्या माध्यमातून आपल्या हस्तकांना सूचना देत असे, जेणेकरून सुरक्षा यंत्रणांना त्याचा सुगावा लागू नये. गर्दीच्या ठिकाणांची रेकी (टेहळणी) करून तिथे भीषण साखळी स्फोट घडवून आणण्याची त्याची तयारी अंतिम टप्प्यात होती.
माहितीनुसार शब्बीर अहमद लोणचे कार्यक्षेत्र हे बांग्लादेशातचं होते. त्या ठिकाणाहून तो बेकायदेशीरपणाने भारतामध्ये घुसून आलेल्या बांगलादेशी नागरिकांना शोधत असे. या सर्व नागरिकांचं तो ब्रेनवॉशिंग करून त्यांना जिहादच्या नावाखाली भारतामध्ये दहशदवादी कृत्य करण्यासाठी त्यांना केले जात होते. धक्कादायक खुलासा म्हणजे, या सर्व घुसखोरांना भारतामध्ये राहण्यासाठी बनावट आधारकार्ड, आणि इतर सरकारी कागदपत्रे मिळवून देण्यामध्ये शब्बीरचा मोठा कट होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये पोलिसांनी पकडलेल्या ८ जणांपैकी ७ जण हे बंगदेशीचं नागरिक होते, ज्यांना शब्बीरनेच भारतात पूर्ण पाने सेट केलं होतं.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत गोपनीयता पाळून राबवलेल्या एका धाडसी मोहिमेमुळे लष्कर-ए-तोयबाचे भारतातील एक मोठे जाळे मुळासकट उपटून टाकण्यात यश आले आहे. अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि तांत्रिक पाळत ठेवल्यानंतर, दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला बेड्या ठोकून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कामगिरी केली आहे.