अयोध्येतील राम मंदिराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कॅनडात वास्तव्यास असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याच्या निशाण्यावर आता अयोध्येतील राम मंदिर आले आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू यांनी मंदिर उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्याचा याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख पन्नू याने हा व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, ‘16 आणि 17 नोव्हेंबरला अयोध्येतील राम मंदिरात हिंसा होईल.’ पन्नू याने राम मंदिराप्रमाणे हिंदूच्या इतर धार्मिक स्थळांमध्येही हिंसा भडकवण्याची धमकी दिली आहे.
‘आम्ही हिंदुत्वाच्या विचारधारचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्येचा पाया हालवून टाकू,’ असा इशाराही पन्नूने व्हिडीओतून दिला आहे. या व्हिडिओमध्ये राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा करत असतानाचे फोटो दाखवण्यात आला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. पन्नू याच्या या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.
पन्नू याने कॅनडातील हिंदूंना धमकी दिली आहे. कॅनडातील हिंदू मंदिरांवर होत असलेल्या खलिस्तानी हल्ल्यांपासून दूर भारतीय हिंदूंनी दूर राहावे, असे पन्नूने धमकावले आहे.
मागील काही महिन्यांत येथील विविध हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत.दरम्यान, भारताने पन्नूला 2020 मध्ये दहशतवादी घोषित केले आहे. त्याने 2007 मध्ये शीख फॉर जस्टिस या संघटनेची स्थापना केली आहे. तेव्हापासून तो भारताविरोधात सातत्याने गरळ ओकत असतो. मुळचा पंजाबमधील अमृतसरचा असलेल्या पन्नूचे संपूर्ण शिक्षण इथेच झाले आहे. चंदीगढ येथील पंजाब विद्यापीठातून त्याने विधी शाखेतून पदवी प्राप्त केली आहे.