अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडल. राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर बसस्थानकात बसमध्येच एसटी ड्राइव्हरने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने बसस्थानकावर एकच खळबळ उडाली. सुरेश चंद्रभान धामोरे (वय 54, रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) या एसटी बसचालकानं स्वतःच्या ताब्यातील बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

१ ऑक्टोबर बुधवारी रोजी तारकपूर-घोसपुरी मार्गावर सुरेश धामोरे आणि वाहक अजय पुंडलिक यांची बस क्र. MH 40 N 8887 दोन फेर्यांसाठी नेमणूक करण्यात आली होती. संध्याकाळी बस स्थानकात परतल्यावर धामोरे यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय स्थानकातील कर्मचाऱ्यांना आला. ही माहिती आगारप्रमुख अविनाश कोल्हापुरे यांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार फिर्यादी शिवाजी मारुती खजिनदार यांनी त्यांना तोफखाना पोलिस ठाण्यात नेलं.
पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली असता मद्यप्राशन केलं असल्याचं निष्पन्न झालं. परिणामी रात्री उशिरा धामोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या मानसिक तणावातूनच त्यांनी काल गुरुवारी सकाळी आपल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असं बोललं जात आहे. धामोरे यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.