मुंबई :- मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याचे समजते. त्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.
रेल्वे रुळावर रात्री त्यांचा मृतदेह सापडला. मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे असे त्यांनी आपल्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितले आणि ते निघाले. त्यांनी बॉडीगार्डला आपल्यासोबत नेले नव्हते. मात्र घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिथे साडे अकराच्या दरम्यान रुळावर झोपले. कल्याणवरुन मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचे पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येते आहे. दोन महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी एक नवीन मोबाईल फोन देखील घेतला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा अशी विनंती मोरेंच्या जवळच्या लोकांनी केली आहे. सुधीर मोरे हे कट्टर ठाकरे समर्थक होते.
सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी संपर्कप्रमुख होते. सुधीर मोरे हे शिवसेनेचे नगरसेवक आणि विभागप्रमुखही होते. त्यांची वहिनी देखील माजी नगरसेविका होत्या.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.