सातारा जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आता एका विवाहितेच्या आत्महत्येचा संबंध असल्याचा संशय व्यक्त होत असून शवविच्छेदन अहवाल बदलला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. वाठार निंबाळकर येथील मयत विवाहिता दिपालीच्या आई-वडिलांनी हा गंभीर आरोप केला आहे.

दिपालीच्या आई - वडिलांनी आरोप केला की त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात चुकीचा शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता. मुलीचं लग्न अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्याशी 2021 मध्ये झालं होतं. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून दिपालीला मानसिक आणि शारिरीक छळाला सामोरं जावं लागलं. अखेर 19 ऑगस्ट 2025 रोजी दिपालीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
मात्र, दिपालीच्या आई भाग्यश्री यांनी ह्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडवकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. "मुलीच्या मृत्यूनंतर पाच दिवस पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल दिला नव्हता. या अहवालावर सही करणाऱ्या महिला डॉक्टर ह्याच आत्महत्या केलेल्या डॉक्टर होत्या," असं भाग्यश्री यांनी सांगितल्याने आता प्रकरणात आणखी गूढ वाढलं आहे.
तसेच, दीपालीच्या कुटुंबियांच्या शंका आणखी गडद झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर भाग्यश्री पाचांगणे यांनी सांगितलं की, "माझ्या मुलीच्या प्रकरणात राजकीय दबाव आणि पोलिसांच्या संगनमताने सत्य दडपलं गेलं. डॉक्टरवर चुकीचा अहवाल तयार करण्यासाठी दबाव होता, आणि त्यांनी आपल्या आत्महत्येच्या पत्रातही अशा प्रकारच्या दबावांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे, आता या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.