नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- अशिक्षितपणाचा फायदा घेऊन वृद्ध महिलेला जावई व मुलीने 20 लाखांचा गंडा घातल्याची घटना जय भवानी रोड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की 65 वर्षीय फिर्यादी प्रमिला रमेश मैना या रेल्वे सेवेतून सन 2020 मध्ये सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना 20 लाख रुपये मिळाले होते. मिळालेली सर्व रक्कम त्यांनी कॅनरा बँकेत भरली. फिर्यादी मैना या मुलगी कृष्णा चंडालिया व जावई राजेश चंडालिया यांच्या समवेत राहत होत्या. सन 2022 मध्ये जावई राजेश चंडालिया याला एक लाख रुपयांची गरज असल्याने त्याने सासूकडे पैशांची मागणी केली.
मैना यांनी “बँकेतून काढून देते,” असे सांगितल्यावर “तुमचे पैसे फिक्समध्ये टाकले असून, ते काढता येणार नाहीत,” असे जावयाने सांगितले.काही दिवसांनी मैदा या पेन्शनची रक्कम काढण्याकरिता बँकेत गेल्या असता एक लाख रुपये काढता येतील का, असे त्यांनी बँकेच्या कर्मचार्याला विचारले. खात्यात इतकी रक्कम शिल्लक नसल्याचे त्याने सांगितले. ही बाब मैना यांनी मुलीला सांगितली असता उडवाउडवीची उत्तरे दिली व भांडण करून तिने आईला घराबाहेर काढून दिले. तेव्हापासून मैना या मोठ्या मुलीकडे राहत होत्या.
मोठ्या मुलीला घेऊन त्या बँकेत गेल्या आणि स्टेटमेंट काढले असता त्यांनी वकिलाचा सल्ला घेतला. बँकेच्या खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे ट्रान्स्फर झाल्याचे वकिलांनी मैना यांना सांगितले. जावई, मुलगी व नातवाने आपला विश्वास संपादन करून खोट्या सह्या करून आपली फसवणूक केल्याचे मैना यांच्या लक्षात आले. या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध मैना यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर करीत आहेत.